Saturday, August 27, 2016

बाकी शून्य : 03

शून्यचा फोन वाजतो.

रिंगटोन असते... नसतेस घरी तू जेव्हा... जीव तुटका तुटका होतो...

रिंगटोन तुटते.. फोन उचलला जातो...

शून्य – हॅलो...

बाकी - बिझी आहेस का.?. तुझी एक मदत हवी होती....

शून्य – बोल

बाकी - एक पत्ता सांगशील का?

शून्य – कुठे जायचंय तुला?

बाकी - खरं तर मलाही नाही माहीत कुठे जायचंय ते.. पण एक अँड्रेस दिलाय

शून्य – पत्ता असल्यावर माणूस नेहमी ठरलेल्या ठिकाणी पोहोचतोच...असं होत
      नाही. माणसं वाटा चुकतात..

बाकी - खरंय तुझं... मला सांगू शकशील का वाट?

शून्य – तू कुठे चुकलीएस ते सांग....मी सांगेन तसं जाशील?

बाकी - तेच कळत नाहीये अरे... तू मला एकदा आणलं होतंस इथे असं वाटतंय..
       नीट आठवत नाहीये..

शून्य – काय पण irony आहे ना. तू पत्ता हि नेमका मला विचारावा.. 
      मी बऱ्याच ठिकाणी जात असतो. सांगतो तुला पत्ता. निदान तुझ्या
      तेवढ्या उपयोगाला तरी येईन मी. एक विचारू?

बाकी - नको.. जेवढ विचारलंय तेवढ़ सांग...प्लीज़

शून्य – पत्ता तू कोणालाही विचारू शकत होतीस मलाच का मग?

बाकी - कारण नाही या मागे काही.. तू यावर तर्क वितर्क लावू नकोस..

शून्य – अजूनही तशीच आहेस... काही बदल नाही

बाकी - मला मदत हवी होती इतकंच

शून्य – थोडक्यात तुला माझी गरज आहे म्हणून

बाकी - हे बघ शून्य तुझ्याइतका शब्दांचा चांगला वापर मला नाही करता येत..

शून्य – तुला शब्दांचा नाही.. पण माणसांचा वापर चांगला जमतो

बाकी - तुझ्याकडून मदतीची अपेक्षा केली ही देखील चुकच झाली माझी.

शून्य – तुझी आणि चूक? ..शक्य नाही आजचा दिवस भाग्याचा
      निदान पत्त्याच्या निमित्ताने तुला मी आठवलो हे हि नसे थोडके..

बाकी - मी स्वच्छ मनाने विचारलं होतं तुला... मदत हवीये

शून्य – स्वच्छ मन? 
       बाकी गटारालाहि आपण स्वछ आहोत असंच वाटतं

बाकी - रहेजा हाऊस, 6th  Floor, धिरेन रोड, ग्रँड रोड.. मुंबई 400 093 हा
      पत्ता... सांगायचा असेल तर सांग...

शून्य – बरं… 657 हि बस डायरेक्ट जाईल तिथे… त्या मोठ्या हॉटेलच्या पाठीमागे
       आहे जपून जा..

बाकी - तुझ्याशी पुन्हापुन्हा वाद नकोय मला...

शून्य – आपलं ज्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीने फक्त पत्ता विचारायला फोन करावा
       हेच मुळात खूपंय... तुला माझी अशी आठवण येते यात बोचरं सुख ही आहे
       आणि सुखद दुःख हि

बाकी - थकले मी या सगळ्याला

शून्य – बाकी तू थकली नाहीयेस.. तू हरवलीएस.
      गुलमोहर थकत नाही… तो सुकतो.. वाळतो.. पडतो.. पण थकत नाही
      माझ्यामुळे थकू आणि थांबू नकोस..

बाकी - तूला छान बोलता येतं.. पण आता माझी ऐकायची कॅपेसिटी संपलीये. 
      त्यामुळेच मी आपल्या दोघांचाही मार्ग मोकळा केलाय. थॅक्स तू वाट 
      सांगितलीस... उशिर होतोय.. निघते मी.. बाय

शून्य – हो तुझी ऐकायची कॅपासिटी संपलीय... पण बोलण्याची आहे. गरज लागली 
      की पत्ता विचारता येतो.. मनात आलं की विचारा.. मनात आलं की दूर 
      करा..

बाकी - बास्स्... संपव हे आता

शून्य - हे तू ठरवायचं नाही आता बाकी. सुरु करणं हा दोघांचा निर्णय होता 
       संपवण्याचा हक्क तुला नाहीय

बाकी - बरं

शून्य - तुला सिच्युएशन हँन्डल करता आली नाही

बाकी - तुझ्यासारखा अधिकार नाही गाजवायचा मला.. काही कर्तव्य ही उरलीएत... 
      ती पूर्ण करावी लागतीलच मला..

शून्य - कर्तव्याची जाण असलेली माणसं अधिकार गाजवणाऱ्याकडे पत्ता विचारतात 
       हे काही बरं नाही. आपल्या दोघांमध्ये पूर्ण असा कधी काही होणारच नाही 
       ना...ना हे वाद.. ना आपलं प्रेम

बाकी - बरोबर.. मला पटलंय तुझं हे.. 

शून्य - बरं. मी सांगितलंय तशीच जा.. आणि जर का पुन्हा चुकलीस तर मी आहेच...

फोन कट..


4 comments: