Wednesday, August 31, 2016

बाकी शून्य : 04

'महिन्याभरापेक्षा जास्त काळ लोटला.  शून्य एकदाही बोलायला आला नाही. ना SMS.. ना FACEBOOKवर Status.. ना Whats Appवर Msg. कसा असेल…? जिथं कुठं असेल तिथं त्यानं त्याची काळजी घ्यावी.

..बहुदा सावरला असेल.  त्याचं भलं व्हावं. माझ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला का त्याला?  त्याच्या घरच्यांना?  सगळ्यांनाच?'

 - मनातल्या विचारांना आवर घालत बाकी घराबाहेर पडली.

'एवढ्यात काही लग्न नको. पण घरातल्यांना रोखणार कसं आणि कधीपर्यंत?  मुलगी असल्यामुळे स्वतःचं घरही परक्यासारखंच वाटतं कधीकधी.
मी कधी एकदाचे संसाऱाच्या बेडीत अडकतेय याची काळजी घरच्यांनाच जास्तंय. 

 - विचारांनी थकून गेलेली बाकी ऑफिसात पोहोचली. PC सुरु केला. तेव्हा अचानक त्या मुलाचा निरोप बाकीला आठवला. 

ऑफिसच्या कामामुळे आपण पर्सनल mail log in करतच नाही. त्या मुलाला आपण पर्सनल मेल आयडी दिला होता.

कामाचा ताण नव्हता. बाकीने Gamil Log in केलं. 

आणि यात खूप खाली शून्यचा महिन्याभरापूर्वी आलेला Mail.

क्षणाचाही विलंब न लावता तिनं Mail उघडला.

Mailचा subject होता 'तू' 

बाकी पत्रात गढून गेली.. शून्यने महिन्याभरापूर्वीच लिहीलं होतं...

तू,

बाकी, ह्या mail चे बरेचसे draft झालेत. दरवेळी send वर गेलेला हात मी मागे फिरवलाय.
दरवेळी तुझ्या उत्तरासाठी मी थांबलोय. आता ते शक्य नाही.

माणसाने प्रेम करावं पण प्रेमात पडू नये...खरंय.

तुझी किती आठवण येते, हे लाल करण्यासाठी केलेला हा खटाटोप नाही. मला बोलायचंय, मला रडायचंय. मला सोबत हवी. आणि माझं असं व्यक्त होणं माझा आधार आहे.
तुला वेळ हवा होता वेळ दिला, विचार करायाला space हवी होती ती ही दिली. आधी नोकरी वगैरे करून दाखव नंतर  बघू हे हि मान्य केलं. पण या आधी-नंतर मध्ये फार अंतर वाढत गेलं बाकी...फार

आणि वर तुला समजणार नाही, please मला समजून घे हे हि समजून घेतलं.

तुला खरंच माझी आठवण येत नाही का किंवा मी आठवत नाही का? बाकी माझ्या आयुष्यात ठरवून काहीच होत नाही. तुझ्या सारखं तर नाहीच नाही. तुला आवडत नाही किंवा चालत नाही म्हणून अजून किती आणि काय-काय मागे टाकलंय मी... आणि आता असं वाऱ्यावर सोडलंयेस मला... जमलं तर येऊन बघ काय झालंय ते!

कितीवेळा मीच बोलायचं... तुला नाही वाटत का?
कितीवेळा ठरवून मी type करत असणारा msg delete करायचा.

तुझ्या statusचा माझ्या मनाप्रमाणे अर्थ लावायचा ....कितीदा?
पार लग्नापर्यंत गोष्टी ठरवून मोकळे झालेलो आपण. थांबायला हवं होतं तेव्हाच ...

मला खूप बोलावसं वाटतं तूझ्याशी... तूला खूप ओरडावसं वाटतं... खूप रडावसं वाटतं... जोरात ओरडावसं वाटतं... पण यातलं मी काहीच करु शकत नाही... हे आणखीनच त्रासदायी होतं... जीवं गेलेला बरा... पण सालं असं जखमी झालेलं केव्हाही वाईट...

तू खूप सोप्पा मार्ग निवडला आहेस बाकी... पण वेळ आणि काळ सगळी समीकरणं स्पष्ट करेल... आयुष्याचं गणितच सालं असंय की आपण लगेच वजाबाक्या आणि बेरजा करायला लागतो... शेवटी  'बाकी' उरणारच नाहीये... 'शून्य'च. 

एक गोष्ट मला कळतेय बाकी... तुला काय किंवा मला काय किंवा सगळ्यांनाच- कोणालाच त्यांच्या मनासारखा साथीदार कधीच मिळत नाही... मला जशी मुलगी हवी तशी तू नाहीयेस... कदाचित तूला जसा जोडीदार हवाय तसा मीही नसेन... पण आपण एकत्र आनंदी राहू शकलो असतो...असो, सगळ्या फाजील शक्यता... आणि हलकट अपेक्षा...

माझ्या बोलण्यात काही चुकून अपशब्द आले असतील तर माफ कर.
मला माहितेय मी शिवी दिलेलं तुला चालत नाही.मी फार अपेक्षा ठेवलेलं देखील चालत नाही.

बाकी...मी श्वास घेतलेला चालतो का गं...कि तो हि…….

तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत नसलेला,

शून्य


Saturday, August 27, 2016

बाकी शून्य : 03

शून्यचा फोन वाजतो.

रिंगटोन असते... नसतेस घरी तू जेव्हा... जीव तुटका तुटका होतो...

रिंगटोन तुटते.. फोन उचलला जातो...

शून्य – हॅलो...

बाकी - बिझी आहेस का.?. तुझी एक मदत हवी होती....

शून्य – बोल

बाकी - एक पत्ता सांगशील का?

शून्य – कुठे जायचंय तुला?

बाकी - खरं तर मलाही नाही माहीत कुठे जायचंय ते.. पण एक अँड्रेस दिलाय

शून्य – पत्ता असल्यावर माणूस नेहमी ठरलेल्या ठिकाणी पोहोचतोच...असं होत
      नाही. माणसं वाटा चुकतात..

बाकी - खरंय तुझं... मला सांगू शकशील का वाट?

शून्य – तू कुठे चुकलीएस ते सांग....मी सांगेन तसं जाशील?

बाकी - तेच कळत नाहीये अरे... तू मला एकदा आणलं होतंस इथे असं वाटतंय..
       नीट आठवत नाहीये..

शून्य – काय पण irony आहे ना. तू पत्ता हि नेमका मला विचारावा.. 
      मी बऱ्याच ठिकाणी जात असतो. सांगतो तुला पत्ता. निदान तुझ्या
      तेवढ्या उपयोगाला तरी येईन मी. एक विचारू?

बाकी - नको.. जेवढ विचारलंय तेवढ़ सांग...प्लीज़

शून्य – पत्ता तू कोणालाही विचारू शकत होतीस मलाच का मग?

बाकी - कारण नाही या मागे काही.. तू यावर तर्क वितर्क लावू नकोस..

शून्य – अजूनही तशीच आहेस... काही बदल नाही

बाकी - मला मदत हवी होती इतकंच

शून्य – थोडक्यात तुला माझी गरज आहे म्हणून

बाकी - हे बघ शून्य तुझ्याइतका शब्दांचा चांगला वापर मला नाही करता येत..

शून्य – तुला शब्दांचा नाही.. पण माणसांचा वापर चांगला जमतो

बाकी - तुझ्याकडून मदतीची अपेक्षा केली ही देखील चुकच झाली माझी.

शून्य – तुझी आणि चूक? ..शक्य नाही आजचा दिवस भाग्याचा
      निदान पत्त्याच्या निमित्ताने तुला मी आठवलो हे हि नसे थोडके..

बाकी - मी स्वच्छ मनाने विचारलं होतं तुला... मदत हवीये

शून्य – स्वच्छ मन? 
       बाकी गटारालाहि आपण स्वछ आहोत असंच वाटतं

बाकी - रहेजा हाऊस, 6th  Floor, धिरेन रोड, ग्रँड रोड.. मुंबई 400 093 हा
      पत्ता... सांगायचा असेल तर सांग...

शून्य – बरं… 657 हि बस डायरेक्ट जाईल तिथे… त्या मोठ्या हॉटेलच्या पाठीमागे
       आहे जपून जा..

बाकी - तुझ्याशी पुन्हापुन्हा वाद नकोय मला...

शून्य – आपलं ज्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीने फक्त पत्ता विचारायला फोन करावा
       हेच मुळात खूपंय... तुला माझी अशी आठवण येते यात बोचरं सुख ही आहे
       आणि सुखद दुःख हि

बाकी - थकले मी या सगळ्याला

शून्य – बाकी तू थकली नाहीयेस.. तू हरवलीएस.
      गुलमोहर थकत नाही… तो सुकतो.. वाळतो.. पडतो.. पण थकत नाही
      माझ्यामुळे थकू आणि थांबू नकोस..

बाकी - तूला छान बोलता येतं.. पण आता माझी ऐकायची कॅपेसिटी संपलीये. 
      त्यामुळेच मी आपल्या दोघांचाही मार्ग मोकळा केलाय. थॅक्स तू वाट 
      सांगितलीस... उशिर होतोय.. निघते मी.. बाय

शून्य – हो तुझी ऐकायची कॅपासिटी संपलीय... पण बोलण्याची आहे. गरज लागली 
      की पत्ता विचारता येतो.. मनात आलं की विचारा.. मनात आलं की दूर 
      करा..

बाकी - बास्स्... संपव हे आता

शून्य - हे तू ठरवायचं नाही आता बाकी. सुरु करणं हा दोघांचा निर्णय होता 
       संपवण्याचा हक्क तुला नाहीय

बाकी - बरं

शून्य - तुला सिच्युएशन हँन्डल करता आली नाही

बाकी - तुझ्यासारखा अधिकार नाही गाजवायचा मला.. काही कर्तव्य ही उरलीएत... 
      ती पूर्ण करावी लागतीलच मला..

शून्य - कर्तव्याची जाण असलेली माणसं अधिकार गाजवणाऱ्याकडे पत्ता विचारतात 
       हे काही बरं नाही. आपल्या दोघांमध्ये पूर्ण असा कधी काही होणारच नाही 
       ना...ना हे वाद.. ना आपलं प्रेम

बाकी - बरोबर.. मला पटलंय तुझं हे.. 

शून्य - बरं. मी सांगितलंय तशीच जा.. आणि जर का पुन्हा चुकलीस तर मी आहेच...

फोन कट..


Monday, August 1, 2016

बाकी शून्य : 02

एका बाजूला प्रेम नाही असं म्हणते आणि दुसऱ्या बाजूला फेसबुक वर हे असं status..



काय अर्थ लावायचा मी... जे आहे ते मान्य का करत नाही ही. मला माहितेय हिला फोन करून विचारल्यावर हि काय म्हणणार पण विचारायला हवं का....? 

हो विचारायला हवंच!

(रिंग जाते...बाकी फोन उचलते)

शून्य : हे तू काय टाकलयेस fb वर?

बाकी : कशाबद्दल बोलतोएस तू.

शून्य : तू आणि मी आपण दोघंही हे दाखवत नाही पण आपल्याला पुर्णपणे माहितेय की आपण एकमेकांचे status चेक करतो..मी आत्ताच तुझं status पाहिलंय. काय लिहिलंयेस हे?

बाकी : अच्छा.. तू त्या बद्दल बोलतोएस... अरे मी सहज लिहीलं...

शून्य : कोणत्याच गोष्टी सहज होत नसतात.

बाकी : मला कुठे लिहीता वगैरे येतं अरे तुझ्यासारखं.....

शून्य : माझ्यासारखं प्रेम करणं तरी कुठे जमतंय तुला. त्यामुळे तुझं आणि माझं कुठल्याच बाबतीत comparison नाही
तू ग्रेटच आहेसहे का एवढंच फक्त विचारतोय

बाकी : माझ्या व्यक्त होण्यावरही तुला प्रॉब्लेम आहे का...
आणि ग्रेट कोण हे जाणून घेण्यात नाही मला काही इंटरेस्ट...
तुलना केलेलीच बरी!

शून्य : तुझ्या व्यक्त होण्यात मी आहे

बाकी : तुझ्यासारखं प्रेम करणं जमलं नाही.... तुझ्यासारखं नाही होता आलं मला.... आणि मला ते जमणार नाही ...
तू वेगळा आहेस आणि मी वेगळी....

शून्य : मी तसं कधी म्हणालो ही नव्हतो कि माझ्यासारखं हो म्हणून
तू 'तू' होतीस म्हणूनच आवडलेलीस

बाकी : माझ्या व्यक्त होण्यात तू आहेस असं तुला वाटतंय...

शून्य : कायअसं मला वाटतंय?
एकदा विचार स्वतः च्या मनाला
निदान तिथे तरी सच्ची रहा
सगळीकडून पळवाट काढता येत नाही

बाकी : मला कोणतेच प्रश्न नको आहेत...
पळवाट काढता येत नाही म्हणूनच पूर्णविराम लावलाय मी...

शून्य : प्रत्येक वेळी असं म्हणता येत नाही बाकी...
तुला प्रत्येकवेळी विचारताना मी आतून तुटलेला असतो
किंचाळत असतो "हे असं का?"
आणि त्यावर तुझं उत्तर मात्र हे असं उत्तर..
या पूर्णविरामाचाच त्रास होतोय मला!
तुला कळत कसं नाही? संपवण्याआधी एकदा विचार कर कि आपण हे सगळं का सुरु केलेलं!

बाकी : मला नाही बोलायचं यावर काहीचं... प्लीज..
मला समजवता नाही येणार... आणि कदाचित तू समजूही नाही शकणार...
फक्त मी करत असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी आहे, असं प्लीज समजू नकोस...
माझ्या प्रत्येक कृतीला स्वतःशी जोडू पाहतोयस तू...
तूला हे थांबवाव लागेल...

शून्य : हे जे आधीच ठरवून तू मोकळी होतेस ना त्याचा मला भयंकर त्रास होतो.
मग हे खरं नाहीय का...मी नाहीय का तुझ्या कृतीत?.. सांग नं

बाकी : मी खरंच सांगते आहे... आणि खरंच सांगितलं होतं..आता खरं मानायचं की नाही, हा तुझा प्रश्नय..

शून्यहो आयुष्यभर काय ते सगळे प्रश्न माझेच आहेत आणि मलाच पडलेत.. रादर माझे प्रश्न जरी वेगवेगळे असले  नं तरी तुझी उत्तरं ठरलेली असतात

बाकी : आज पडलेले प्रश्न उद्या वॅलिड असतील असंही नाही ना...? उद्या तुला नवीन प्रश्न पडतील... मुळात मला प्रश्नच नकोएत.. नाही कोणती उत्तर हवीएत...

शून्य : माझ्या कृतीवर माझा कंट्रोल नाही, त्यामुळे इथे थांबावं लागेल, इथून सुरु करू हे नाही जमत मला

बाकी : कुठेतरी हे थांबायला हवं.. हे तरी कळलं आहे तुला तर....

शून्य : कळणं... आणि समोर आलं आहे ते मान्य करणं यात फरक आहे

बाकी : मान्य तू करत नाहीएस...!

शून्य : मग काय करतोय मी?
ते ही आता मला तू सांगणार का?
ते ही सांगून टाक... निदान इथे तरी तुझे हक्क दिसू दे

बाकी : का ताणतोएस…?
ताणलं की तुटणार... हे तूच म्हणायचास..
मग का हा अट्टाहास..

शून्य : पण सावरलं तर जोडता येतं हे ही मी म्हणायचो
तू तुझ्या सोयीप्रमाणे लक्षात ठेवलंएस

बाकी : मी विसरलेए सगळं...
नाही आठवायचंय मला काहीच...

शून्य : विसरण्यासाठी सगळं लक्षात असावं लागतं
म्हणजे अजूनही काही आठवणी छळतात तुला तर

बाकी : मला तुझ्यासारखं नाही सगळं उघड उघड सांगता येत...

शून्य : आता पाहिल्यासारखं काहीच राहिलं नाही,विसरून जा
हे कसं उघडपणे बोललीस मग

बाकी : काही गोष्टी बोलता तुला कळल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती..

शून्य : ज्या गोष्टी मी बोलून तुला समजत नाहीय तिथे
काही गोष्टी तू बोलता मी समजाव्या हे चुकीचं नाही का

बाकी : माहीत नाही... जे काही चुकलंय ते माझंच चुकलंय.... चुका माझ्याकडूनच होत गेल्या... मीच चुकीची आहे ... तर तू का मला पुन्हा मिळवण्याचा चुकीचा प्रयत्न करतोय...

शून्य : चूक झाली म्हणून 'सोडून देणं' हा पर्याय नाही
आणि चूक तुझ्या एकटीची नाही
तुझ्या इतकाच मी ही गुन्हेगार आहे
त्याशिवाय का आपलं प्रेम असं वाऱ्यावर....

बाकी : मी सगळं वाऱ्यावर सोडून दिलंय...
आता वाऱ्यानेच ठरवायचं... काय करायचं आणि काय नाही ते...

शून्य : वाऱ्याला दिशा कळली असती तर आणखी काय हवं होतं

बाकी : तूझी फिलॉसॉफी ऐकण्यात नाही इंटरेस्ट मला...

शून्य : मग कशात आहे, फेसबुक वर अपडेट करण्यात?

बाकी : तुझ्यासारखे शब्द नाहीत माझ्याकडे.... माझ्याकडे आता काहीच नाही...मी स्वतःही नाही..

शून्य : माझ्यात आहेस तू अजून
हवं तर घेऊन जा स्वतःला

बाकी : तुझ्यापर्यंत नाही पोहोचता येणार आता
आणि मला तुझ्यापर्यंतचा प्रवासच नकोसा झालाय...
प्लीज यावर 'का' असं विचारु नको..

शून्य : मी काय म्हणू?   काही विचारण्याआधीच तू  सगळं ठरवून टाकलयेस!
आणि तो प्रवास बहुतेक आता तुला जमणार ही नाही..
बाकी facebook वर जे update केलयेस त्यात चुकून माझं नाव आलंय ते तेवढं delete कर..
तेवढाच तुझा प्रवास सोप्पा होईल..

बाकी : मी स्टेटसच डिलीट करते... रादर फेसबुकचं अकाउंटच डिलीट करायलं हवंय..

शून्य : त्यापेक्षा मला unfriend कर ते जास्त बरं पडेल.
आणि delete करून वस्तुस्थिती टाळता येते.. पण पळता येत नाही
हवं ते कर.. शेवटी बाकी शून्य उरणार ते माहितेय आपल्याला.. 


(बाकीचा बाय ऐकण्याची तसदीही न घेता शून्यने फोन कट केला..)