सांगून थकले मी. पण हा ऐकायलाच तयार नाही.
का असं वागतो हा..? मला त्रास देऊन याला कोणता आनंद मिळत असेल...?
जाऊ दे ना म्हटल्यावर विषय संपवत पण नाही...
बोलायचं तर आहे..पण विचारणार नाही तो.. मलाच काहीतरी करायला हवं आता...
रिंग वाजली...
बाकी : हॅलो
शून्य : बोल..
बाकी : कसाएस?
शून्य : कसा असणं अपेक्षित आहे?
बाकी : तू कोडी करत बसणार आहेस की बोलणार आहेस माझ्याशी?
शून्य : बोलतोय!.. बोल...
बाकी : काय करतोएस? तुझी आठवण येतेय फार ...तु फोन नाही केलास, कामात आहेस का?
शून्य : .अं... हो कामात आहे आणि.. फोन करुन ही कशी आहे बरी आहेस का जेवलीस का हे बोलणं मला नाही जमत आणि हो... आठवण येते हे ऐकून बरं वाटलं
बाकी : मला वाटलं तूलाही येत असेल म्हणून कॉल केला.. बोल ना काहीतरी छानसं
शून्य : सोडून तू गेलीएस मी नाही, त्यामुळे मला आठवण येते का हा प्रश्नच नाही
बाकी : प्लीज आपण नॉरमल बोलूयात का?
शून्य : हल्ली छान बोलता येत नाही.. आपण एकदा शेवटचं पहिल्यासारखं होऊयात का..? शेवटचं ही नाही कायमचंच पहिल्यासारखं होऊयात का? तू माझ्या कोणत्याही प्रश्नाला बांधील नाहीस
बाकी : तुला खरं सांगू का, मला यावर नाही काही विचार करायचा आता..
शून्य : उत्तर नाही दिलस तरी चालेल..
बाकी : काचेच्या ग्लासाला तडे गेले की ते जोडता येतीलही कदाचित.. पण ते काचेच ग्लास पूर्वीसारखं नाही राहतं..
शून्य : सुरु करण्याआधीच आपण विचार केला असता तर बर झालं असतं
बाकी : काच तडकलीए..
शून्य : एका काचेत एकच प्रतिबिंब दिसतं.. तुटलेल्या काचेत मी हजारवेळा तुला पाहू शकतो. त्या प्रत्येक तुकड्यात तू दिसतेस मला त्याचं काय?
बाकी : तू मला पुन्हा प्रपोज नको करुस.. प्लीज
शून्य : नाही.. मी नाही करणार प्रपोज.. घाबरु नकोस
बाकी : माझा स्वतःवरचा विश्वास मी गमावून बसलेय
शून्य : मी लवर होतो... डेस्पो नाही...
बाकी : तू गैरसमज नको करुन घेऊस..
शून्य : काही समज असले तरच गैरसमज होतात..
बाकी : तुझ्यासमोर कधी-कधी काय बोलायचं हा प्रश्न मला अजुनही पडतोय अरे.. तू प्लीज काळजी घे स्वतःची...नको माझा विचार करुस
शून्य : मी घेईनच माझी काळजी.. घ्यायलाच हवी.. जगण्याची सवय आता व्हायलाच हवी. प्रश्न पडतात पण तरी मनाला हवं तेच करतेस... रादर केलंसच ना..?
बाकी : हो मला कळतंय की माझं चुकलंय.. पण मला यातून बाहेर पडायचंय मी वाईट वागलेए तुझ्याशी
शून्य : चांगलं वाईट असं काही नसतं.. आणि मी आता तुला चांगलं काय किंवा वाईट काय.. काहीही म्हटलं तरी फरक पडणार नाही.. आता सगळंच मागे राहिलंय
बाकी : हो
शून्य : बाकी कशीएस?
बाकी : एकटी पडलीए... सावरण्याचा प्रयत्न करतेय.
शून्य : सावरशीलच
बाकी : तू कसाएस?
शून्य : काय उत्तर देऊ..? ठिक बरा..चांगला?
बाकी : मला वाटतं तुला कधीतरी भेटावं, तुझ्या समोर यावं..तुझा हात हातात धरावा ..पण हिम्मत नाही होत...
शून्य : नाही होत ते बराय.. कारण तुला कधीतरी वाटणारी फिलींग मला नेहमी वाटतते.. शक्यतो भेटणं टाळूच..
बाकी : हो.. पण तुला वाटलं तर तू कर मला फोन.. जसं जमेल तसं बोलेन मी.. थोडं फार
शून्य : मला वाटलं तर..? का तुला वाटणार नाही का कधीच?
बाकी : तुझ्यासारखं नाही बोलता येणार मला... संदर्भ बदललेत आता अरे
शून्य : स्पष्टीकरणं तीच आहेत ना पण..? आणि संदर्भ बदलेत ..की माणसं..?
बाकी : माहित नाही..! चल जाते..
शून्य : हे तुझं बराय..
बाकी : नंतर बोलते वेळ मिळाला की.. काळजी घे... फार विचार नको करुस.. बाय..!!
शून्य : हम्म्म...!!
फोन कट
अखेर बाकी शून्य..!
