Monday, December 12, 2016

बाकी शून्य : 07

बाकीच्या व्हॉट्स अपवर एका Unknown नंबर वरुन मेसेज येतो.
नंबर सेव नसल्यानं डिपीही दिसत नाही. कोणंय कळत नाही.

Unknown number  - तू कुठेएस?

                                 तू कुठेएस?
                                 की तू नाहीचएस?
                                 की तू असल्याचे पुरावेही खोटेएत?
                                 मनातली गुंतागुंत खोटीए?
                                 की हे अस्ताव्यस्त पसरत जाणारं
                                 आठवणीचं वादळ खोटंए?
                                 काय खोटंए?
                                 किंवा खरंए?
                                 खऱ्या खोट्या मधूनही
                                 तुझ्या माझ्यासाठी काय बरंए?
                                 तू कुठेएस?
                                 की तू नाहीचएस?
                                 माझ्या निस्तेज चेहऱ्यात आहेस?
                                 की हजारो वर्षांची जागरणं साठवून?
                                सताड उघड्या असणाऱ्या डोळ्यातएस ?
                                जमिनीशी तह केलेल्या पावसातएस?
                                की रखरखत्या मनाने शह दिलेल्या उन्हातएस?
                                तू कुठेएस?
                                किंवा तू नाहीचएस?
                                कुणी कधीच मारलेल्या डेस्परेट मिठीतएस?
                                की दिलेल्या हजारो मायेच्या हाकेतएस?
                                हजारो अनरिड मेल्सध्येएस?
                               की लाखो ड्राफ्टअनडिलिव्हर्ड मेसेजेसमध्येएस?
                               तू कुठेयस?
                               की तू नाहीचएस?
                               की तू असल्याचे पुरावेही खोटेएत?
                                       - जाधव गुरुप्रसाद

बाकी                     : कुणाचा नंबर आहे हा?
Unkown number  : मी शून्य.
                              नंबरही डिलिट केलास बहुदा माझा...
बाकी                       :  k..
शून्य                     :   पण तू तर मला ब्लॉक केलं होतंस... माझा मेसेज
                               तुझ्यापर्यंत पोहोचला कसा?

बाकी मला माहितीये तू रोखल स्वताला...
          पण हल्ली खूप आठवण येते रे तुझी...
         तुलाही येत असेलच... पण आज सांगवसं वाटलं
शून्य  आठवण आणि माझी?
बाकी हो.. तुझी.... तुला नाही येत?

शून्य  इतक्या महिन्यानंतर तुला मला हे प्रश्न विचारावेसे वाटतायेत..
          मी जगतोय तुझ्या आठवणी शिवाय!
          नाही येत तुझी आठवण!!
बाकी काल तू बर्थडे विश केलंस तेव्हा वाटलं.. सगळं सोडून 
          निघून यावं तुझ्याकडे.. पण....
          त्यात काल तू पाठवलेली ती कविता...
          नाही थांबवू शकले स्वताला.. तुला मेसेज करण्यापासून
शून्य  गुरूच्या कवितेमुळे एवढा फरक पडणार होता तर आधी संगायचस
          अक्ख्या गुरुला समोर उभं केलं असतं

बाकी इथेच तर चूक केलीस...
शून्य  बाकी मला आता माझ्या चुका तुझ्याकडून ऐकायच्या नाहीयेत
बाकी स्वताची गोष्ट दुसर्यात शोधण थांबव शून्य.. for god sake
शून्य  आणि बाकी तू स्वतःला असं इतरांमध्ये हरवायचं थांबव
शून्य  माझा शोध संपलाय
बाकी प्लीज भांडू नकोस..

बाकी घरी कसे आहेत सगळे?
शून्य  नाही बाकी मी भांडणारी नाही. तो हक्क माझा नाही
शून्य  बरे आहेत
शून्य  तू कशी आहेस
बाकी मी कशी आहे हे तुला चांगल माहीत आहे ना शून्य?
बाकी वाईट आहे मी!

शून्य माहित असून सुद्धा काय करू शकलो मी फक्त बघण्यावाचून?
शून्य : I hope तुझे प्रश्न सुटले असतील
शून्य माझ्यामुळे disturb होणारी तू आता शांत झाली असशील

बाकी हो.. शांत झालेय अस वाटत होत काही महिने.. 
          शांत तर झाले   मीप्रश्न निकाली काढले
          पण सोडवू शकले नाही याची खंत अस्वस्थ करते हल्ली
शून्य  : Hmm हल्ली 
शून्य  बाकी फार protected वातावरणात वाढलीयेस तू
          आणि आपल्या माणसात असलं की दुसऱ्यांची दुःख समजत नाही
बाकी सॉरीमला माफ़ कर... पण तू मूव on झालाएस हे पाहुन बर वाटत...
शून्य  मलाही बरं वाटलं. मी असा move on होताना आज असं तू
         पाठीमागे खेचलंस हे बघून


बाकी तुला आठवतै का... एकदा अशाच आपण ट्रैक ला गेलेलो...
          माझी पहिलीच ट्रैक होती.. 
          सगळे भरभर पुढे निघून गेले... आणि माझा पाय सटकला
          निसर्ड्या मातिवरून... 
          तेव्हा तू पाठीमागे खेचलस मला... सावरलस.. असो..
          चल bye, बोलू नंतर.
शून्य तू आपल्यातलं सगळं तोडल्यावरही मी मागे खेचत होतो तुला...
          पण बहुतेक तुझा हात निसटलाकधीही सावरण्यासाठी...असो
          बोलू सगळं नंतरच बोलू, Bye!!



Tuesday, October 11, 2016

बाकी शून्य : 06

सोशल मीडियाचा हल्ली फार म्हणजे फारच कंटाळा येतो. 
कधीही असा विचार केला नव्हता की फेसबुक शिवाय जगू शकेन.  पण खरंय.. काम असलेल्या माणसाला फेसबुकशी घेणंदेणं नसतंच मुळी. 
तू सोडून गेलीस. आणि मी फेसबुकला सोडलं. दोन्ही एकाचवेळी घडलं.

आज विजयादशमी. कुणीतरी आज सीमाल्लोंघन केलेलं ना.. ?



आपल्या नात्याचंही तसंच काहीतरी झालंय, असं शून्यला राहून राहून वाटत होतं..

खरंतर बऱ्याच दिवसांनंतर आज सुट्टी मिळालीय. बॉसनं स्वतःहून येऊ नको म्हणून सांगितलं. 
नाहीतर आपल्याला काही जरुर वाटत नव्हती सुट्टीची.

चला ..थोडा टाईमपास करु 
फेसबुकचा पासवर्ड आठवतोय.. पण लास्ट टाईम केव्हा लॉग ईन केलेलं.. 
जराही स्मरणात नाही.

शून्यने फेसबुक लॉन इन केलं नोटीफिकेशन्सचा ढेर..

चाळीस एक फ्रेन्ड रिक्वेस्ट.. हे अपेक्षितच होतं..

पण इथूनही शून्यने सरळ वाट धऱली ती बाकीची..

बाकीच्या टाईमलाईनवर शून्य जेव्हा गेला.. तेव्हा कळलं की आता बाकीनं त्याची मैत्रीही शिल्लक ठेवली नाही 

((बाकीने फेसबुकवरुन शून्यला unfriend केलं. त्यावर राहवून शून्यने बाकीला तडक फोन केला..))

शून्य :  मला फारच वाईट वाटलंय बाकी
           इतकं काही मोठं घोडं मारलं नव्हतं गं मी कधीच...
           अनफ्रेन्ड केलंस मला तू..
           धक्का बसलाय...
           न पचणारा...
           इतका वाईट आहे मी... लाज वाटली मला माझीच...

बाकी :  आपल्याला दोघांना त्रास होत होता शून्य
            आणि जे पुढे न्यायचच नाही ते असं टांगून का ठेवावं
            आता आशा अपेक्षा नकोत

शून्य  :  मारायचंच होतं तर पुन्हा जीव का ओतला होतास...
            सोडूनच जायचं होतं तर आलीसच कशाला होतीस तू परत..

बाकी : मी परत आले नव्हते. मला पळपुटी व्हायचं नव्हतं

शून्य  : जे काही असेल यार...

बाकी : मी सावरण्याचा प्रयत्न केला

शून्य :  याला तू प्रयत्न म्हणत असशील तर फार लवकर अपशय
          स्वीकारलंस गं.. बेक्कार फिलिंग असतं.. तोंडावर भडाभडा 
          शिव्या दिल्या असत्यास ना...तर जास्त बरं वाटलं असतं गं... 
          तुला एकट्यालाच भावना आहेत असं वागू नकोस

बाकी :  गप्प राहून काय मिळालं तुला.. तुझं व्यक्त होणं आणि 
            माझं व्यक्त होणं वेगळं आहे

शून्य : काय साध्य केलंस तू या सगळ्यातून...

बाकी : तू बोलून काय मिळवलयेस

शून्य :  नाही समजून घ्यायचं मला व्यक्त होण्याच्या 
           पद्धती.. काहीच नाही

बाकी : शून्य ऐक कितीही वाद केले तरी आपण एकमेकांना असं 
           एकमेकांवर लादू शकत नाही

शून्य :  का नाही लागू शकत यार..
           का नाही मोकळेपणे भांडू शकत..
           का नाही ओरडू शकत एकमेकांना..
           का नाही..

बाकी : कारण माणसं हक्काच्या माणसांसोबतच भांडतात

शून्य :  तू कशी काय एवढी थंड राहू शकतेएस यार...
          तुला काहीच कसं वाटत नाही...
          तिळपापड होतोय माझा..
          फेसबुकवरुन अनफ्रेंड केलंयस मला तू..

बाकी : कारण यातून काहीच निष्पन्न होणार नाही
           जिथे पुढे एकत्र चालायचंच नाही तिथे सोबत करण्यात काय अर्थ

शून्य :  मला फार हर्ट झालंय..
          रागाच्या भरात मी ब्लॉकच केलंय 

बाकी : मला त्रास काय कमी होत असेल का 

शून्य :  मेलो आहे का मी यार..
          एवढं निष्ढूर वागावं माणसानं..
          अशी तर काही चूक नव्हती ना केली मी..

बाकी : किती काय काय थांबवणार तू
           तुझ्या मित्रांचे msg
           तुझं असं लिहिणं
           मला आवडतं असं वाटतं का तुला?

शून्य  :  पुन्हा प्रेम नाही करता येत गं..
           सगळं आठवतंच..
           पहिल्यासारखं..

बाकी :  मी फक्त unfriend केलंय
            मी हवं तेव्हा तुला बघू शकते

शून्य  :  नाही पाहू शकणार यापुढे 

बाकी :  ब्लॉक करणं आणि unfriend करणं यातला फरक समाज

शून्य :  नाही पाहू द्यायचंय. मला
          वैताग आलाय मला..
          आणि रागही..
          हरामखोर आयुष्य सालं..

बाकी : मी रडत नाही म्हणजे मला पडलेली नाही असं 
           नाही

शून्य : माणूस रडला म्हणजे दुःख संपलं असं झालं असतं.. 
         तर मेल्यानंतर सगळीचं आपली माणसं रडली असतील..

बाकी :  हो केलं तुला unfreind आता पुढे काय
            Freind राहून असं काय करत होतो आपण

शून्य :  बरोबरच आहे तुझंही..
          म्हणूनच ब्लॉक केलंय मी..
          एखादा माणूस तुमची वाट पाहतोय.. याची जाणीव 
          कुणी ठेवायची....
          बास्सस..
          पुरे झालं..
          प्रेम बिम असं काही नससं... असं वाटायला लागलंय मला..

बाकी : आपण असं वागून असं वागून एकमेकांचं 
           एकमेकांच्या आयुष्यातलं महत्व वाढवतोय असं नाही वाटत तुला?

शून्य :  ते वाढवलंच आहे ना..
          नाहीच जगू शकत ना..
          आठवण काढल्याशिवाय..
          आठवण ऑक्सिजनचं काम करतेय सध्या...

बाकी : हेच oxygen विष होण्याआत विसरून जा

शून्य : मला पटल नाहीये..
          मला अस वाटतंय की माझा अपमान झालय..
          मी सहज प्रोफाइल पाहायला गेलो
          तर मला unfriend केलेल दिसल

बाकी : आणि त्याचं उत्तर म्हणून तू ब्लॉक केलयेस

शून्य : वाईट वाटणार नाही का... मी माझ्या चुका स्वीकारलेल्या बाकी

बाकी :  तू चुका स्वीकारल्या म्हणून मी निर्णय बदलावेत 
           ही barter system झाली

शून्य : निर्णय बदल. अस एकदाही आग्रह केला नाही..
          कोणीही जबरदस्ती केलेली नाही
          मी बदल केलेत माझ्यात.....
          तू ही केले असतील
          virtual त्रास दिला का कधी?

बाकी :  मी एवढंच सांगते की माझा त्रास कमी व्हावा 
           यासाठी मी  solution शोधलंय
           त्यावर तू त्रास करून घेऊ नकोस
           आपण पुन्हा नव्याने बोलू एक छान मित्र म्हणून राहू.. 

शून्य : बरं... जशी तुझी इच्छा..

बाकी : कसं चालूय मग सगळं?

शून्य : रोजची ट्रेन
          ऑफिस
          Perfect टाइम मध्ये lunch
          संध्याकाळी सांगता वेळेवर मिळणारा चहा
          कधी तरी तूझ्या आठवणीत छोटा गोल्ड फ्लेक 
          घरी येणं
          रात्रीचं जेवण 
          झोप 
          सगळं सुरळीत
          माझं आयुष्य सोडलं तर 'बाकी' सगळं सुरळीत चालूय..


(फोन कट...बाकी काही म्हणता फोन कट करते)

Tuesday, September 6, 2016

बाकी शून्य : 05


वर्षभरापूर्वी बाकीने फेसबुकवर पोस्ट केलेलं स्टेटस आज तिची आठवण बनून आलंय.

"दिलेस का प्रेम तू कुणाला..तुझ्याच जे अंतरात आहे..."

Listening सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
Share your memory सांगतंय Facebook

अजून काय काय सांगणारेय देव जाणे. शून्यचं पत्र नुकतंच वाचलंय

बाकीलाही त्रास होतोय...कदाचित शून्यपेक्षाही जास्त. 
नकळत तिचाही हात keyboard कडे वळालाय.

..भराभरा type करतेय.. 

ती....

तुझं सगळं पत्र मनाशी बेईमानी करून वाचतेय. 
उशीर केला मी, सगळ्यालाच. मान्य.

तुला काय रिप्लाई करु मी? माझा गोंधळ उडालाय...
मला कळून चुकलंय की तूझ्या चिडचिडेपणाचं मूळ कारण मी आहे...
आणि तू नकोएस मला असा चिडचिडा... वैतागलेला

नाही पाहू शकत मी तुला असं. मी परिस्थिती ही नाही बदलू शकत शुन्य... 
तू तुझ्या सवयींवर मात करशील...आज करशील...
उद्या करशील... परवा करशील...
कधीतरी करशील... पण नाही... तसं होतंय असं वाटत नाही

मला तू हवा होतास... कदाचित हवा आहेस ही... पण
आता मला तुझी भीती वाटते शुन्य... तू स्वताला मझ्याभोवती गुरफटुन ठेवालंयस
तू स्वतःचा आनंदच विसरून गेलाएस...
तुला असही वाटतंय की मी तुझ्यात गुरफटुन जावं.. जे काही अंशी मलाही मान्य आहे... बहुदा होतं..
हो...प्रेमच करत होते रे मी... तू प्रेमात पड़ायला भाग पाडलस.... आणि त्यातून बाहेर पडायलाही...

वैतागले मी.
अक्षरशः थकले तुला एकच गोष्ट सांगून सांगून..
तुझं असं माझ्यात बंदिस्त होणं मला नाही पटत आहे शून्य. तू खूप चांगला आहेस. तुझं हेच मोठेपण मला नाही पेलवत.

प्रत्येक वेळी व्यक्त झालास इथे तिथे सर्वत्र.. आणि माझ्या व्यक्त ना होण्यामुळे मी आरोपी ठरले?
तुम्ही सगळ्यांनी असं पिंजऱ्यात उभं केलंय मला. आपल्या भावनांशी सच्च राहणं हा गुन्हा आहे का?
पुन्हा पुन्हा तेच वाद.. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न
पुन्हा पुन्हा तोचतोचपणा.. किती दिवस सहन करणार होतास तू मला?

मान्य मला की मी कमी पडले... नाही पूर्ण करु शकले तूझ्या अपेक्षा...
कळत होतं मला की मी कधीच तुला सुखात ठेवू शकत नाहीये...
त्यामुळे तू कायमचा आयुष्यभर चिड़चिड़ा झालेला नाही रे बघावणार मला...
मला अपराधी बनून नाही आयुष्य घालवायचंय...

कधी कधी तर असं वाटतं की... तुला सांगून कळणारच नाहीये...
तर का हे सगळं तुला सांगा.. का हे सगळ बोला?

प्रत्येकवेळी वाद टाळण्यासाठी मी गप्प राहिले.... निमुटपणे त्या सर्व गोष्टी पचवल्या... ज्या मला कधीच पटल्या नव्हत्या..
न पेटलेल्या गोष्टी समजून घेण्यातही प्रेम होतंच...

मी खरंच कशाचा हिशोब ठेवला नाही. हिशोब ठेवून कुणी नाही प्रेम करत रे. कसं कळत नाही तुला..
स्वताला वाहून नाही देऊ शकत मी तुझ्यासाठी...
पण जेव्हा कळलं कि असं कुढत राहणं दोघांसाठीही त्रासदायक आहे ...तेव्हा मी आले प्रवाहाबाहेर..

याला practical विचार करणं म्हणतात. तूझ्या भाषेत याला धोका देणं म्हणत असतील...

तुझ्या कवितेत तुझं समर्पण दिसतं पण माझ्या विचारात वास्तव आहे हे विसरू नको.
प्रेम केलंय मी तुझ्यावर...
तेव्हा तुला दिलेलं वचन.. तुला दिलेल्या शपथा...हे काही खोट नव्हतं...
बाकी तेव्हाही प्रामाणिक होती आणि आजही आहे..

मी माझ्याशी प्रामाणिक आहे...
पण तू ज्या बाकीवर प्रेम करायचास ती बाकी आता उरली नाहीये रे..
आता बाकी राहिलंच नाही काही.

तुला दिलेल्या शपथा, वचनं, आपण सोबत घालवलेले निवांत क्षण... या सगळ्यात मी आनंदी होते. पण आता.... आता त्या आनंदापेक्षाही मला खूप शांत वाटतंय.
तुला विसरले नसले तरी मला तुला आठवायचं नाहीये.. प्लीज..

शून्य मी माझ्या भावनांशी सच्ची राहिलीय. माझ्या भावनांवर तुझा ही हक्क होता शून्य ..म्हणून मी चुकले.. हे मला मान्य आहेच.
पण जिथे मन नाही तिथे हा पुढचा प्रवास आपण कसा पार पाडणार होतो शुन्य?

तुझ्या भावनांचा गुंता एकवेळ तू सोडवशीलही.. पण माझ्या विचारांचं काय...
मलाही आयुष्यात प्रश्न आहेत, जे मी माझ्या पद्धतीने सोडवू पाहतेय.
आता कुणी मला काहीही विचारत नाही...

आता कोणालाच काही सांगावं लागत नाही... सगळ्या बंधनातून मुक्त झालेय मी....
स्वछंदी वाटतंय...
पण हे देखील तु समजून घेणार नाहीस..यातूनही तू तुझे अर्थ काढशील... तुझे संदर्भ जोडशील....
माझ्या या स्पष्ट विचारांचं नागडेपण तुला दिसेल का? किंवा दिसलं तरी तुला समजेल का?
शून्य गळा काढून रडलं म्हणजेच माणूस दुःखी आहे असं नाही. 
न समजणारे हुंदके ऐकायला शिक... 

मला असं वाटतं... थांब १ मिनिट

का लिहिल मी हे....

Select All!

Delet!