Tuesday, September 6, 2016

बाकी शून्य : 05


वर्षभरापूर्वी बाकीने फेसबुकवर पोस्ट केलेलं स्टेटस आज तिची आठवण बनून आलंय.

"दिलेस का प्रेम तू कुणाला..तुझ्याच जे अंतरात आहे..."

Listening सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
Share your memory सांगतंय Facebook

अजून काय काय सांगणारेय देव जाणे. शून्यचं पत्र नुकतंच वाचलंय

बाकीलाही त्रास होतोय...कदाचित शून्यपेक्षाही जास्त. 
नकळत तिचाही हात keyboard कडे वळालाय.

..भराभरा type करतेय.. 

ती....

तुझं सगळं पत्र मनाशी बेईमानी करून वाचतेय. 
उशीर केला मी, सगळ्यालाच. मान्य.

तुला काय रिप्लाई करु मी? माझा गोंधळ उडालाय...
मला कळून चुकलंय की तूझ्या चिडचिडेपणाचं मूळ कारण मी आहे...
आणि तू नकोएस मला असा चिडचिडा... वैतागलेला

नाही पाहू शकत मी तुला असं. मी परिस्थिती ही नाही बदलू शकत शुन्य... 
तू तुझ्या सवयींवर मात करशील...आज करशील...
उद्या करशील... परवा करशील...
कधीतरी करशील... पण नाही... तसं होतंय असं वाटत नाही

मला तू हवा होतास... कदाचित हवा आहेस ही... पण
आता मला तुझी भीती वाटते शुन्य... तू स्वताला मझ्याभोवती गुरफटुन ठेवालंयस
तू स्वतःचा आनंदच विसरून गेलाएस...
तुला असही वाटतंय की मी तुझ्यात गुरफटुन जावं.. जे काही अंशी मलाही मान्य आहे... बहुदा होतं..
हो...प्रेमच करत होते रे मी... तू प्रेमात पड़ायला भाग पाडलस.... आणि त्यातून बाहेर पडायलाही...

वैतागले मी.
अक्षरशः थकले तुला एकच गोष्ट सांगून सांगून..
तुझं असं माझ्यात बंदिस्त होणं मला नाही पटत आहे शून्य. तू खूप चांगला आहेस. तुझं हेच मोठेपण मला नाही पेलवत.

प्रत्येक वेळी व्यक्त झालास इथे तिथे सर्वत्र.. आणि माझ्या व्यक्त ना होण्यामुळे मी आरोपी ठरले?
तुम्ही सगळ्यांनी असं पिंजऱ्यात उभं केलंय मला. आपल्या भावनांशी सच्च राहणं हा गुन्हा आहे का?
पुन्हा पुन्हा तेच वाद.. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न
पुन्हा पुन्हा तोचतोचपणा.. किती दिवस सहन करणार होतास तू मला?

मान्य मला की मी कमी पडले... नाही पूर्ण करु शकले तूझ्या अपेक्षा...
कळत होतं मला की मी कधीच तुला सुखात ठेवू शकत नाहीये...
त्यामुळे तू कायमचा आयुष्यभर चिड़चिड़ा झालेला नाही रे बघावणार मला...
मला अपराधी बनून नाही आयुष्य घालवायचंय...

कधी कधी तर असं वाटतं की... तुला सांगून कळणारच नाहीये...
तर का हे सगळं तुला सांगा.. का हे सगळ बोला?

प्रत्येकवेळी वाद टाळण्यासाठी मी गप्प राहिले.... निमुटपणे त्या सर्व गोष्टी पचवल्या... ज्या मला कधीच पटल्या नव्हत्या..
न पेटलेल्या गोष्टी समजून घेण्यातही प्रेम होतंच...

मी खरंच कशाचा हिशोब ठेवला नाही. हिशोब ठेवून कुणी नाही प्रेम करत रे. कसं कळत नाही तुला..
स्वताला वाहून नाही देऊ शकत मी तुझ्यासाठी...
पण जेव्हा कळलं कि असं कुढत राहणं दोघांसाठीही त्रासदायक आहे ...तेव्हा मी आले प्रवाहाबाहेर..

याला practical विचार करणं म्हणतात. तूझ्या भाषेत याला धोका देणं म्हणत असतील...

तुझ्या कवितेत तुझं समर्पण दिसतं पण माझ्या विचारात वास्तव आहे हे विसरू नको.
प्रेम केलंय मी तुझ्यावर...
तेव्हा तुला दिलेलं वचन.. तुला दिलेल्या शपथा...हे काही खोट नव्हतं...
बाकी तेव्हाही प्रामाणिक होती आणि आजही आहे..

मी माझ्याशी प्रामाणिक आहे...
पण तू ज्या बाकीवर प्रेम करायचास ती बाकी आता उरली नाहीये रे..
आता बाकी राहिलंच नाही काही.

तुला दिलेल्या शपथा, वचनं, आपण सोबत घालवलेले निवांत क्षण... या सगळ्यात मी आनंदी होते. पण आता.... आता त्या आनंदापेक्षाही मला खूप शांत वाटतंय.
तुला विसरले नसले तरी मला तुला आठवायचं नाहीये.. प्लीज..

शून्य मी माझ्या भावनांशी सच्ची राहिलीय. माझ्या भावनांवर तुझा ही हक्क होता शून्य ..म्हणून मी चुकले.. हे मला मान्य आहेच.
पण जिथे मन नाही तिथे हा पुढचा प्रवास आपण कसा पार पाडणार होतो शुन्य?

तुझ्या भावनांचा गुंता एकवेळ तू सोडवशीलही.. पण माझ्या विचारांचं काय...
मलाही आयुष्यात प्रश्न आहेत, जे मी माझ्या पद्धतीने सोडवू पाहतेय.
आता कुणी मला काहीही विचारत नाही...

आता कोणालाच काही सांगावं लागत नाही... सगळ्या बंधनातून मुक्त झालेय मी....
स्वछंदी वाटतंय...
पण हे देखील तु समजून घेणार नाहीस..यातूनही तू तुझे अर्थ काढशील... तुझे संदर्भ जोडशील....
माझ्या या स्पष्ट विचारांचं नागडेपण तुला दिसेल का? किंवा दिसलं तरी तुला समजेल का?
शून्य गळा काढून रडलं म्हणजेच माणूस दुःखी आहे असं नाही. 
न समजणारे हुंदके ऐकायला शिक... 

मला असं वाटतं... थांब १ मिनिट

का लिहिल मी हे....

Select All!

Delet!